Thursday, October 16, 2025

Swarachit Kavita स्वरचित कविता

Swarachit Kavita स्वरचित कविता

          

  १) हयात (आयुष्य)


गावठाणावरील मोडक्या झोपडीत 

अख्या हयातीच स्वप्न पाहिलं

सपराच पाचट सावरता सावरता 

पोटातल्या पोटात गाभडून राहिल.


उद्या नाही तर परवा, 

पाची पक्वान्न मिळतील. 

लाल दिव्याची गाडी, 

आपल्या बापाची राहील. 

पण उभ्या हयातीत, 

चिमणी जाळायला घासलेट नाही भेटलं.


सुर्वेंचा भाकरीचा चंद्र, 

त्यांना आकाराने तरी दिसला 

आकारच काय पण, 

चंद्रकोर कशी असते हेही, 

हयातीत नाही पाहिलं.

 

दररोजचा कामाचा रगाडा, 

गोवऱ्या पंन्या जमा करून हाडाची काड झाली,

पण तीच बापाची हाड जाळाय रेटुक नाही भेटलं. 

रेटका रेटका साठी दंगे, धोपे.

एक दिवस नक्कीच उठतील,

हाती येऊन मशाली,

गावं गावं मुळापासून पेटतील.


📚🖋️राहुल मोरे

  ९४२१६१२९७९



       २) श्रावण सरी

श्रावणातल्या सरींनी, 

गेले न्हाऊनी मन,

दश-दिशा उजळल्या 

गेल्या विरुनी तम. 


हिरव्यागार वनराईला

साज चढे नवा, 

मरगळलेल्या लतांना 

जणू भेटलासे दवा. 


काळेशार पाषाण पाझरती,

जणू चंदेरी झालर, 

पाना फुला पक्षांना

आला चैतन्याचा बहर.


निळ्या सावळ्या डोहावरती 

बेट बांबूचे सळसळती,

क्षणात सोनेरी उन्ह पडे

क्षणात श्रावण सरी कोसळती.


बालकवींचा श्रावणमास 

आज आम्हासी दिसलासे,

आनंद विभोर होऊनी नाचती

सृष्टी चराचर उल्हासे.


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९



          माझा जन्म गाव तांडा


माझा जन्म गाव तांडा,

पोटासाठी वसलेला.

काबाड कष्ट करून,

अन्ना साठी त्रासलेला 


उन्हा तान्हात कष्ट करून,

पावशेर पिठ आणायचं.

तेल मिरची मिळत नाही,

मीठ घालून उकडायच.


खाण्यासाठी जगतात लोक, 

म्हणून त्यांनी जगायचं.

आमचं मात्र तस नाही,

आम्ही जगण्यासाठी खायचं.


📚🖋️ राहुल मोरे 

9421612979



       ४. जुगारी


मी जुगारी, मी शराबी 

' शाव ' म्हणती मला तरी बी "१"


मी लुच्चा, मी लफंगा 

'राव' म्हणती मला तरी बी "२"


मौन धारण केले जरीही 

' घाव ' म्हणती मला तरी बी "३"


कवडी मोल जिणे माझे

' भाव ' वाढला मला तरी बी "४"


जे न देखिले मी कधीही 

' दाव ' म्हणती मला तरी बी "५"


स्पर्श न केला मी जलाला 

'नाव' म्हणती मला तरी बी "६"


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९



      ५. चातकाचे अभंग


पेर पेगु नारा

देतो हा बिचारा 

वाजवितो पावा 

करीतसे धावा "१"


एक एक थेंबासाठी 

झाला कासाविस 

हरिनाम जप

करी रात्रंदिस "२"


वरुणाचा थेंब 

त्याचा आत्मा कोंब 

दाही दिशा मंदी 

उसळला डोंब "३"

 

पेरक्या ईनंती 

करी त्याची खरी 

न फुटे पाझर 

त्याची न्येत बुरी "४"

 

ये 'मेघा' जोमानं 

दे रे जीवदान 

सैर भैर झालो 

पुरव तू आन "५"


वागनुक तूही 

अशी कशी आहे 

मीत ' मी ' बिचारा 

अपराध साहे "६"



📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९




       ६.  हेमंत 



अंकुरली कोंब

कोंब, दवा दवांनी 

आदित्यान केली रास 

आपुल्या त्या किरणांनी "१"


माय माउली कशी

वसंता सम बहरली

भाळी लावून कुंकूम

जशी नवरी सजली "२"


पांघराला हिरवा शालू

तृण गालिचा घेऊन

मदनाची आली रती

प्याला मद्या चा पिऊन "३"


नशा वेगळीच हेमंताची 

गार थंडीची ती सुरखी

वाटे न धरतीला ' मी '

पोरा सोरा वाचून पोरकी "४"


उषेच्य ना-ना कला 

कला एकेक उमलती

काक कोकिळेच्या मनी  

रास क्रिडा उमलती "५"


दिसा मागून दिस

दिस एकेक गणतीला 

आठवणी साऱ्या साऱ्या

माझ्या हो संगतीला "६"


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

14 comments:

  1. खूप छान, तुम्ही जे लिहिले आहे ते आमच्यासाठी खूप प्रेरणादाई आहे , अतिशय सुंदर रचना केलेली आहे

    ReplyDelete
  2. खूपच छान सर जी 👌👌 तुमच्या कविता काळजालाच हात घालता आहेत. 👍👍

    ReplyDelete
  3. खूपच छान सर जी 👌👌👌 तुमच्या कविता काळजालाच हात घालता आहेत .. 👍👍

    ReplyDelete
  4. अप्रतिम काव्य

    ReplyDelete
  5. सुंदर काव्य रचना

    ReplyDelete
  6. अप्रतिम

    ReplyDelete
  7. अतिशय छान

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेखन, अतिशय सुरेख आणि ग्रामीण भाषेचे शब्द जणू मनाला भिडणारी काव्य.

    ReplyDelete

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...