Showing posts with label Uddhvast Vada कविता. Show all posts
Showing posts with label Uddhvast Vada कविता. Show all posts

Sunday, April 12, 2026

उद्ध्वस्त वाडा

 उद्ध्वस्त वाडा


जुना, कवलारू, चिरेबंदी वाडा 

शांत विचारमग्न.


प्रत्येक खनाखनात बोबडे बोल 

अन् ओसरितील नाजूक पावलांची कंपने, 

तो हसरा खेळकर माहोल 

अनुभवतोय आजही..


कालपर्यंत याच छताखाली 

ज्यांना ऊब दिली 

ती आज भुर्रकन कशी बरं 

उडून गेली ?

नव्याने पंख फुटल्या सारखी!

कुणाला क्षितिज पदाक्रांत करायचय 

तर, कुणाला दर्या कवेत घ्यायचाय.

वाडा मात्र स्तब्द स्थितप्रज्ञ 

ते परतून येतील या आशेवर 


कधीतरी दोन-चार वर्षातून 

गेरु फासावा 

अन् नवा रंग चढवावा 

पहिल्या पावसात धुवून निघण्यासाठी 

मग ते गेरु रंगाचे ओघळ 

अन् जखमा लिंपलेले चुन्याची धब्बे 

ठळक दिसावेत 


पण, तरीही आज नाहीतर उद्या 

आपला जीर्णोद्धार होईल. 

या आशेवर तग धरून बसायचं 

येणाऱ्या वाटेकडे बघायचं 

डोळ्यात तेल घालून 


चिरेबंदी दिसणाऱ्या भिंती, 

आतून साऱ्या पोखरलेल्या. 

एक एक विटा एकमेकीतून निसटलेल्या 


अंगणातील तुळशीचीही हीच गत 

ती ही तहानलेली पाण्यावाचून.

तिला तर आताशा स्वप्न पडतात,

अवतीभवती सडा अन रांगोळीची.


याच साठी का?

ऊन वारा पाऊस 

घेतला होता अंगा खांद्यावर 

शेवटच्या क्षणी बे-सहारा होण्यासाठी 

तुळशी वाड्याकडे अन् वाडा तुळशीकडे 

पाहत राहतात केविलवण्या नजरेने 

उरल्या सुरल्या दिवसांचे सोबती होण्यासाठी 


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...