Friday, October 31, 2025

Kunabyache Abhang




  कुणब्याचे अभंग


देवनी धाडना, उघडा वाढना 

कष्टात सडना, शेतकरी


जगना पोशिंदा, कुंबिकिना धंदा

खावलाना वांधा, कर्जा पायी


सावकार लुटे, सरकार रुठे 

जावो तरी कोठे, पोट पायी


धरती रूठनी, आकासना साठे 

गायनात पाटे, ह्या चाकना


मर मर मरू, बच्चा कच्चा पायी 

हातम्हा न काही, कधी लागे 


उगवना दिस, जाई तो कामम्हा 

जयना कोमम्हा, मनोमनी 


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Thursday, October 30, 2025

Hirav Jaga Kavita

 


 हिरव जग


दुर देशीच्या रे राजा,

बघ दुरून हे जग

हीर्व्या राव्याला नग फसू, 

त्यात आटली काळजाची रग


हे खेड्यातल जग, 

बघ राजा दुरून 

माया आपुलकी तूही 

बघता जाईल सरून 


जिवा भावाचे मैतर, 

सोन्या-चांन्या जोडीला.

ट्रॅक्टर टरकाची नाही सव 

माझ्या त्या काळया माडीला 


पांढरा धोट शाळू 

दूर देशी रे जातो 

पाण्या पावसानं भिजलेलं 

राजा डिस्को रे आम्ही खातो 


घोर कष्टाचे हे जिणे 

आमच्या रे भाळी 

रक्ताचं पाणी कराया 

बापा मांग लेकाची रे पाळी 


दिस उगवला तसा 

बैल घाण्याला जुंपला 

कोदा उपसु उपसू 

शेवटी म्हसणी खपला



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

Tuesday, October 28, 2025

Aatmahatya Kavita

           


  

               आत्महत्या


हाडांचा सापळा होऊन 

खांद्यावर मणभराचा नांगर, 

काबाड कष्ट करतो 

शेतकरी बाप माझा. 


कोरभर तुकड्यासाठी 

रक्ताच पाणी, 

देह गहाण ठेवतो 

मीठ मिरची पाई.


डोक्यावर कर्जाचे ओझं महामुर झालं 

पावसानं पाठ दावली, 

शासनानं टांग वर केली

म्हणून..

गळा फास जवळ करतो 

शेतकरी बाप माझा 


लांड्या बांधावरच्या बाभळीला 

लटकलेलं बापाचं भूत 

खाली काढायला, 

जमलेत सारे पांढरे कावळे 

अन् मेल्यावर... 

जगाचा पोशिंदा म्हणून 

हिणवायला.

 

 कवड्या गोट्या फेकावे 

तसे आश्वासन फेकून गेलेत. 

ती हाती यायच्या आतच 

हवेत विरून गेलीत. 


अचानक वावटळ उठावी 

अन् काही क्षणात विरून जावी 

अगदी तसा.. 

माझा शेतकरी बाप, 

विरून गेला मनामनातून.... 

साऱ्यांच्याच..... 

कायमचा.... 

अगदी मायच्या बी....

 


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

Evadhich Ichha Kavita

 



            येवढीच इच्छा 


काळया कुट्ट गाभाऱ्यात 

एखादं निस्तेज रोपट डूलाव 

पिवळ्या पानांनी 

तसं हे माणसाचं निस्तेज जीवन...

 

शिवबाच्या या देशात 

माणसानंच माणसाचा 

प्यावा 'खुन '

आणि...

आपणच आपलं अंग 

आपल्याच रक्तान माखलय 

असं घ्यावं सोंग. 

 

भर रस्त्यावर 

बापानं पोरीचा,

अन् पोरानं आईचा,

सौदा करावा

ही लाजिरवाणी गोष्ट.


पोटासाठी 

चौका चौकात 

आयाबाया नटताना दिसतात 

रात्रीच्या 

ह्याला कुठेतरी भेटावा विराम, 

अन् 

थांबावं सार जागच्या जागी 

 

आणि... 

 

उद्याचं नाव सूर्य 

आपल्या नव्या डोळ्यांना 

नवलाईने दिसावा 

एवढीच इच्छा....


 

📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Sunday, October 26, 2025

Manus harvat chalalay

 


  माणूस हरवत चाललाय


सुगीचे दिवस आलेत की माझ्या बापाची 

एकच धांदल असायची

मठ, मुग ज्वारी बाजरी याचे खळे लावायचे. 

बाजरीची सुडी,मठाची गंजी घालून व्यवस्थित 

शेकारायचे,

ह्या आवकळी पावसाच्या धाकाण.


मायचं मात्र मधीच टूमण असायचं 

चार दिवसांवर दिवाळी आली..., 

विना गोड धोडाची दिवाळी 

चटणी भाकरीवर निघायची

आख्खी दिवाळी हंगाम आवरण्यात जायची

पण, 

तरी सुध्दा त्या दिवाळीत मज्जा असायची 

गोड धोड नसलं म्हणून काय झालं

गोड माणसं मात्र सोबत राहायची.

काका काकू आत्या मामा अन् सारी भावंडं 

यांनी घर कसं भरून जायचं 

शरिरान वेगळे तरी मनानं एक रहायचं 


आता मात्र तसं काही उरलं नाही.  

एका घराची दोन दारं झाली

कामा धंद्याच्या निमित्तानं 

माणसं शहराकडे गेली.

आता दिवाळीला एकत्र येत नाही. 

आलेच तर दोन दिवसाच्या वर राहत नाही.

राहिलीच तर एफडी, भिसी, फ्लॅट आणि कार

याचंच तुणतुणं चालतं फार


माया, ममता हरवत होती

आपुलकीनं विचारपूस नव्हती 


अवकाळी पावसाच्या धाकान बाप गंजी, सूडी 

झाकायचा. 


पण, आता काय? 

इथं आपलेपणाचाच दुष्काळ पडत चाललाय. 

माणूस जिता असून हरवत चाललाय

बापाच्या मनातली

ती सुगी, ती गंजी काही केल्या जात नाही.

जीव तीळ तीळ तुटल्या वाचून राहत नाही


पण त्याला कुठ माहीत..

की,

या सिमेंटच्या जंगलात माणसं झालीत परकी 

आता आपल्याजवळ फक्त ती आठवण 

डोळ्यांची खासड झाल्या सारखी.



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

Manatlya Manat kavita

              



           मनातल्या मनात 

 

लई वाटतं... 

संसाराचा गाडा भरधाव वेगाने चालावा

वंगण दिल्या चाकावानी गर गर फिरवा 

पण,

मधातच एखादा गाच्का यावा 

अन् निखळून पडवीत आरे पाटे.

 

लई वाटतं...

पोरायले शिकवून मोठ्ठं करावं, 

त्यांच्यात बघावं डाक्टर इंजिनेर. 

पण पोटाचा प्रश्न..

अन् मग एखाद्यानं शेण काढावं, तर दुसऱ्यांन 

वैरण.

शाळा कॉलेजचे जीवन त्यांचं सालदारकीत जावं 

कोरभर तुकड्यासाठी दिस दिस राबावं 


नव्या नवती ची पोरं 

चीमटलेल्या म्हाताऱ्या गत दिसावी, 

मणा मणाचं ओझ घेऊन पाठीत थोडी वाकावी.


लई वाटतं..

बाप जाद्यांना जे नाही जमलं ते आपुन करावं 

आकाशाकडे झेप घेऊन त्याला मुठीत धराव.

पण झेप घेण्या आधीच पंख 

परस्थितीने बेंबळी व्हावीत 

अन् हाती यावं फक्त जखमेवरच्या हाड्या

          चिमण्या वाळण.


मग कशाचा डाक्टर अन् कशाचा इंजीनेर...

संसाराच्या चाकाचे निखळलेली आरे पाटे गोळा 

करून 

द्यावेत रेटा वर रेट अन् हारावर हार 

अन् चढवत जावी धाव ,

फाटलेल, विरलेल 

ठिगळ लावून जोडत रहायचं 

मनातल्या मनात...


लई वाटतं...

बापूंच्या ह्या देशात 

भावानं भावाला द्यावा हात 

अन् म्हणावं, हम सब साथ साथ

पण,

लोण्याचा गोळा दिसताच 

पडतात पोटच्यांचे, पाठच्यांचे खून,

अन् राहत सार जगाच्या जागी.

आखलेल, पाहिलेलं स्वप्न थिजून जातं 

मनातल्या मनात... 


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Friday, October 24, 2025

Shetakari Kavita

 



      शेतकरी 

 

आल्या पावसाच्या सरी 

सुखावला शेतकरी 

सुखावला शेतकरी 

करी मातीची चाकरी


बीज पेरले मातीत 

गाणं गाईला खुशीत 

गाणं गाईला खुशीत 

भाळ धन्याचे लिहीत 


बीज टरारून आले 

भाळी नशीब कोरले 

भाळी नशीब कोरले 

स्वप्न उद्याचे पाहीले 


पीक नाचते कुदते 

जरा पाठीत मोडते 

जरा पाठीत मोडते 

गंध वाऱ्यात सोडते 


माझा शेतकरी राजा 

रक्त आटून राबवतो 

रक्त आटून राबवतो 

पीक मोत्याचे काढतो


हिर्वी गार पाने फुले 

भरी मोतीयाची दाणे 

भरी मोतीयाची दाणे 

पीक आले जणू सोने 


रिप रिप चिखलात 

पाय रुतून बसते 

पाय रुतून बसते 

दारी मरण दिसते


त्याच्या नशिबी यातना 

घोर कष्टाचे हे जिणे 

घोर कष्टाचे हे जिणे 

भार जगाचा वाहने



📚🖋️  राहुल मोरे 

         ९४२१६१२९७९

Thursday, October 23, 2025

Mahima Rajgadacha kavita

 

        महीमा राजगडाचा






राजगडाचा राजा मोठा, रुबाब त्याचा भारी हो. 

तळागाळातील सामान्यांचा, तोच एक कैवारी हो. 


येतील सतरा जातील अठरा, बरोबरी न त्याची हो. 

लक्ष देऊनी सांगतो ऐका, महिमा राज-गडाचा हो. 


सुवर्णानील पोटी पुत्र जन्मला, नाव त्याचे राजीव असे.

कले कलेने वाढतो चंद्र, तसे हे रत्न वाढले हो.


जन्मत:च मुखी सोन्याचा चमचा, गर्व न कधी भाळी हो.

जनमाणसात रमला माझा, राजा हा एक इमानी हो.


येतील सतरा जातील अठरा, बरोबरी याची नाही हो. 

राजगडाचा सिंह शोभे, अभिषेक त्याचा छावा हो.


प्रेम देणे प्रेम घेणे, हा तर याचा वसा असे. 

राजा शिवबासम, न्यायावर त्याच्या विश्वास बसे. 


चाळीसगावा उद्योग नगरी,  त्यानेच ती केली हो. 

गोरगरीब जनतेची, तोच झाला भाकरी हो.


याचक बनुनी गेला कुणीही, तो रिता न आला कधी.

अर्ध्यावरती डाव मोडूनी, माझा राजा गेला हो.


कवी राहुल विनंती करतो, कार्य त्यांचे मनी स्मरा. 

नियतीने डाव गिरवला, राजीव सम अभिषेक धरा.


मुठ👊🏻 आवळूनी कंबर कसूनी, मागे आता उभे राहू.

भरभरून ज्याने प्रेम वाटले, त्या प्रेमाचे उतराई होऊ.


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Mla Rajiv Dada

 





       मा.आ.राजीव दादा                    (शांत युगाचा झाला अंत)


शांत, सोज्वळ, मितभाषी, अजातशत्रू

हे सारे गुण तुमच्यात दडले होते.

तुमच्या जाण्याने सर्व सामान्यच काय?

तर आसमंत देखील रडले होते.


आज शांत युगाचा झाला अंत

शोकमय झाला सारा आसमंत.

चाळीसगाव नगरीचे विकास पर्व,  

आज थांबले याची खंत.


राजकारणा सोबत समाजकारण,

दादासाहेब तुम्हीच करावे.

रोजच येतात-जातात सर्व,

तुम्ही मात्र किर्तिने उरावे. 


चाळीसगाव नगरीचे भगीरथ पुत्र, 

जलदूत तुमची ओळख होती. 

तेलाने दिवे सर्वच पेटवतात, 

पाण्याने तुम्ही पेटवल्या जीवन-ज्योती. 


विकास नगराचा कसा करावा, 

हे तुम्हीच दाखवले होते. 

पोस्टरबाजी, जाहिरात करूनी 

जनतेला तुम्ही फसवले नव्हते. 


मनामनावर अधिराज्य करणारा 

आज माणुसकीच्या झरा आटला. 

चाळीसगाव नगरीच्या तळपत्या सूर्या 

नियतीने मात्र एकट्यात गाठला. 

नियतीने मात्र एकट्यात गाठला.......


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

Wednesday, October 22, 2025

Bap Kavita

              बाप


 

 लंगड्याचा पाय

वासराची गाय

दुधावरची साय 

       आई असते. 

असे फ.मु. म्हणतात


पण,

खरा सूत्रधार,

जीवनाचा आधार, 

गावाचा पार...

        बाप असतो


मायेचा पाझर

वसंताचा बहर

जिव्हाळ्याची घागर.    

          आई असते

पण,

चैत्राचा बहर

उन्हाचा कहर

दुःखाचा डोंगर 

         बाप असतो

 

पायातला काटा

सळसळत्या वाटा

क्षमलेल्या लाटा

             आई असते

पण, 

उसळत्या लाटा

जीवनाचा रहाटा 

घड्याळाचा काटा

         बाप असतो


रेशमाचे वस्त्र

प्रेमाचे अश्र 

काळजीची रात्र 

         आई असते

पण, 

उबदार शाल

पाठीवरची ढाल 

चूकचूकणारी पाल 

       बाप असतो 


समईची वात 

जागणारी रात 

अंगाई ची साथ 

       आई असते

पण,

समईतलं तेल 

वातीचा मेळ 

शब्दांचा खेळ 

       बाप असतो 


वात्सल्याची मूर्ती 

त्रैलोकी कीर्ती 

अशी निस्वार्थी

        आई असते

पण,

वात्सल्याची खान

रामाचा बाण 

निर्णयाशी ठाम 

        बाप असतो 


मायेची साद 

प्रेमाची खाद 

मागणीला दाद 

      आई असते 

पण,

घराचा खांब  

कपाळाचा घाम 

खिशातला दाम 

        बाप असतो....बाप असतो


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Sunday, October 19, 2025

Hemant Hrutu

 






    हेमंत 



अंकुरली कोंब

कोंब, दवा दवांनी 

आदित्यान केली रास 

आपुल्या त्या किरणांनी "१"



माय माउली कशी

वसंता सम बहरली

भाळी लावून कुंकूम

जशी नवरी सजली "२"



पांघराला हिरवा शालू

तृण गालिचा घेऊन

मदनाची आली रती

प्याला मद्या चा पिऊन "३"



नशा वेगळीच हेमंताची 

गार थंडीची ती सुरखी

वाटे न धरतीला ' मी '

पोरा सोरा वाचून पोरकी "४"



उषेच्य ना-ना कला 

कला एकेक उमलती

काक कोकिळेच्या मनी  

रास क्रिडा उमलती "५"



दिसा मागून दिस

दिस एकेक गणतीला 

आठवणी साऱ्या साऱ्या

माझ्या हो संगतीला "६"




📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

Saturday, October 18, 2025

Megh-Dhara kavita

Megh-Dhara kavita       

 


मेघ-धरा (मृग नक्षत्र)


कृष्णवर्णी मेघराज, धरणीला देतो साद. 

तुझ्या माझ्या मिलनाचा, दिस आला आहे आज. 


विरहाचे दिस सरूनी, मिलनाची आहे सांज 

कृष्णवर्णी मेघराज, धरणीला देतो साद. 


ये ग ये जवळी तू, ये अशी मिठीत. 

आलिंगन दे अशी की, गीत गाऊ खुशीत. 


नको नको मेघराया, सबुर धर जरा मनी. 

चीट पाखरू रानी वनी, चोरून पाहीन कुणी.

 

तुझ्या माझ्या प्रीतीचा, हाच खरा आहे साज. 

कृष्णवर्णी मेघराज, धरणीला देतो साद. 


तुझ्याविना का माझा, उद्धार या जगी

तुला दुरावनी का, मी होऊ रे अभागी.


तूच माझे जिणे अन्, तूच माझे गाणे. 

सात सूर फिके अन्, सारे हे तराणे. 


मधुर या समयीचा, हाच का रे राज.

कृष्णवर्णी मेघराज, धरणीला देतो साद.

 

तुझ्या माझ्या मिलनाचा, दिस आला आहे आज.

कृष्णवर्णी मेघराज, धरणीला देतो साद.



📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Bhangalelya Deshache Abhang

      


भंगलेल्या देशाचे अभंग

मनी भ्रष्टाचार, 

झाला शिष्टाचार, 

चोरट्यांचे कर, 

फार झाले "१"


देशा मनी भाव, 

सांगे सर्वा राव, 

खुर्ची साठी हाव, 

मना मंदी "२"


एकतेच्या बाता, 

मारी ती सर्वता, 

देशात बंधुता, 

कोठे आहे "३"


राजकारण हे,

करिती जातीच,

मोल न मातीचं, 

त्यांना कळे "४"


लोभ संपत्तीचा, 

उदय स्वार्थाचा,

हा मानवतेचा,

गळा घोट "५"


समता बंधुता,

पुस्तकाची पानं,

 यांना त्याची जान, 

कोठे आहे "६"


राजकारणी हे, 

पांढरे कावळे, 

त्यांचेच सोहळे, 

फार झाले "७"


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Thursday, October 16, 2025

Swarachit Kavita स्वरचित कविता

Swarachit Kavita स्वरचित कविता

          

  १) हयात (आयुष्य)


गावठाणावरील मोडक्या झोपडीत 

अख्या हयातीच स्वप्न पाहिलं

सपराच पाचट सावरता सावरता 

पोटातल्या पोटात गाभडून राहिल.


उद्या नाही तर परवा, 

पाची पक्वान्न मिळतील. 

लाल दिव्याची गाडी, 

आपल्या बापाची राहील. 

पण उभ्या हयातीत, 

चिमणी जाळायला घासलेट नाही भेटलं.


सुर्वेंचा भाकरीचा चंद्र, 

त्यांना आकाराने तरी दिसला 

आकारच काय पण, 

चंद्रकोर कशी असते हेही, 

हयातीत नाही पाहिलं.

 

दररोजचा कामाचा रगाडा, 

गोवऱ्या पंन्या जमा करून हाडाची काड झाली,

पण तीच बापाची हाड जाळाय रेटुक नाही भेटलं. 

रेटका रेटका साठी दंगे, धोपे.

एक दिवस नक्कीच उठतील,

हाती येऊन मशाली,

गावं गावं मुळापासून पेटतील.


📚🖋️राहुल मोरे

  ९४२१६१२९७९



       २) श्रावण सरी

श्रावणातल्या सरींनी, 

गेले न्हाऊनी मन,

दश-दिशा उजळल्या 

गेल्या विरुनी तम. 


हिरव्यागार वनराईला

साज चढे नवा, 

मरगळलेल्या लतांना 

जणू भेटलासे दवा. 


काळेशार पाषाण पाझरती,

जणू चंदेरी झालर, 

पाना फुला पक्षांना

आला चैतन्याचा बहर.


निळ्या सावळ्या डोहावरती 

बेट बांबूचे सळसळती,

क्षणात सोनेरी उन्ह पडे

क्षणात श्रावण सरी कोसळती.


बालकवींचा श्रावणमास 

आज आम्हासी दिसलासे,

आनंद विभोर होऊनी नाचती

सृष्टी चराचर उल्हासे.


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९



          माझा जन्म गाव तांडा


माझा जन्म गाव तांडा,

पोटासाठी वसलेला.

काबाड कष्ट करून,

अन्ना साठी त्रासलेला 


उन्हा तान्हात कष्ट करून,

पावशेर पिठ आणायचं.

तेल मिरची मिळत नाही,

मीठ घालून उकडायच.


खाण्यासाठी जगतात लोक, 

म्हणून त्यांनी जगायचं.

आमचं मात्र तस नाही,

आम्ही जगण्यासाठी खायचं.


📚🖋️ राहुल मोरे 

9421612979



       ४. जुगारी


मी जुगारी, मी शराबी 

' शाव ' म्हणती मला तरी बी "१"


मी लुच्चा, मी लफंगा 

'राव' म्हणती मला तरी बी "२"


मौन धारण केले जरीही 

' घाव ' म्हणती मला तरी बी "३"


कवडी मोल जिणे माझे

' भाव ' वाढला मला तरी बी "४"


जे न देखिले मी कधीही 

' दाव ' म्हणती मला तरी बी "५"


स्पर्श न केला मी जलाला 

'नाव' म्हणती मला तरी बी "६"


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९



      ५. चातकाचे अभंग


पेर पेगु नारा

देतो हा बिचारा 

वाजवितो पावा 

करीतसे धावा "१"


एक एक थेंबासाठी 

झाला कासाविस 

हरिनाम जप

करी रात्रंदिस "२"


वरुणाचा थेंब 

त्याचा आत्मा कोंब 

दाही दिशा मंदी 

उसळला डोंब "३"

 

पेरक्या ईनंती 

करी त्याची खरी 

न फुटे पाझर 

त्याची न्येत बुरी "४"

 

ये 'मेघा' जोमानं 

दे रे जीवदान 

सैर भैर झालो 

पुरव तू आन "५"


वागनुक तूही 

अशी कशी आहे 

मीत ' मी ' बिचारा 

अपराध साहे "६"



📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९




       ६.  हेमंत 



अंकुरली कोंब

कोंब, दवा दवांनी 

आदित्यान केली रास 

आपुल्या त्या किरणांनी "१"


माय माउली कशी

वसंता सम बहरली

भाळी लावून कुंकूम

जशी नवरी सजली "२"


पांघराला हिरवा शालू

तृण गालिचा घेऊन

मदनाची आली रती

प्याला मद्या चा पिऊन "३"


नशा वेगळीच हेमंताची 

गार थंडीची ती सुरखी

वाटे न धरतीला ' मी '

पोरा सोरा वाचून पोरकी "४"


उषेच्य ना-ना कला 

कला एकेक उमलती

काक कोकिळेच्या मनी  

रास क्रिडा उमलती "५"


दिसा मागून दिस

दिस एकेक गणतीला 

आठवणी साऱ्या साऱ्या

माझ्या हो संगतीला "६"


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

Wednesday, October 15, 2025

Vichardhan विचारधन

Vichardhan विचारधन

वारंवार जर चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि त्या गोष्टींना विरोध करण्याऐवजी समर्थन करावे लागत असेल किंवा विरोध करू शकत नसल्यास आपण आपला मार्ग बदललेला केव्हाही योग्यच.

📚🖋️ प्रा.श्री.राहुल मोरे 




 स्वार्थी आयुष्य जगणाऱ्या लोकांनी इतरांना उदारता शिकवायची नसते.

📚🖋️प्रा.श्री.राहुल मोरे




आयुष्याचं गणित सोडवता सोडवता भागाकार जरी मोठा येत असला तरी बाकी मात्र शून्यच येते.


📚 प्रा.श्री. राहुल मोरे


आपल्या घरचा सोन्याचा धूर हा कुणाच्या स्वाभिमानापेक्षा मोठा नसतो.

📚🖋️ प्रा.श्री. राहुल मोरे 



Ego आणि Self Respect यातील फरक न समजणारे लोक Self Respect ला Ego समजतात.

📚🖋️ प्रा.श्री. राहुल मोरे 


 परिस्थिती आणि वेळ नाजूक असली म्हणून समोरची व्यक्ती लाचार नसते. कुठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात त्याचा स्वाभिमान जागृत असतो, म्हणून माणसाने तोल आणि बोल(शब्द) जपून वापरावेत.


📚🖋️ प्रा.श्री.राहूल मोरे


Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...