Friday, October 31, 2025

Kunabyache Abhang




  कुणब्याचे अभंग


देवनी धाडना, उघडा वाढना 

कष्टात सडना, शेतकरी


जगना पोशिंदा, कुंबिकिना धंदा

खावलाना वांधा, कर्जा पायी


सावकार लुटे, सरकार रुठे 

जावो तरी कोठे, पोट पायी


धरती रूठनी, आकासना साठे 

गायनात पाटे, ह्या चाकना


मर मर मरू, बच्चा कच्चा पायी 

हातम्हा न काही, कधी लागे 


उगवना दिस, जाई तो कामम्हा 

जयना कोमम्हा, मनोमनी 


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Thursday, October 30, 2025

Hirav Jaga Kavita

 


 हिरव जग


दुर देशीच्या रे राजा,

बघ दुरून हे जग

हीर्व्या राव्याला नग फसू, 

त्यात आटली काळजाची रग


हे खेड्यातल जग, 

बघ राजा दुरून 

माया आपुलकी तूही 

बघता जाईल सरून 


जिवा भावाचे मैतर, 

सोन्या-चांन्या जोडीला.

ट्रॅक्टर टरकाची नाही सव 

माझ्या त्या काळया माडीला 


पांढरा धोट शाळू 

दूर देशी रे जातो 

पाण्या पावसानं भिजलेलं 

राजा डिस्को रे आम्ही खातो 


घोर कष्टाचे हे जिणे 

आमच्या रे भाळी 

रक्ताचं पाणी कराया 

बापा मांग लेकाची रे पाळी 


दिस उगवला तसा 

बैल घाण्याला जुंपला 

कोदा उपसु उपसू 

शेवटी म्हसणी खपला



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

Tuesday, October 28, 2025

Aatmahatya Kavita

           


  

               आत्महत्या


हाडांचा सापळा होऊन 

खांद्यावर मणभराचा नांगर, 

काबाड कष्ट करतो 

शेतकरी बाप माझा. 


कोरभर तुकड्यासाठी 

रक्ताच पाणी, 

देह गहाण ठेवतो 

मीठ मिरची पाई.


डोक्यावर कर्जाचे ओझं महामुर झालं 

पावसानं पाठ दावली, 

शासनानं टांग वर केली

म्हणून..

गळा फास जवळ करतो 

शेतकरी बाप माझा 


लांड्या बांधावरच्या बाभळीला 

लटकलेलं बापाचं भूत 

खाली काढायला, 

जमलेत सारे पांढरे कावळे 

अन् मेल्यावर... 

जगाचा पोशिंदा म्हणून 

हिणवायला.

 

 कवड्या गोट्या फेकावे 

तसे आश्वासन फेकून गेलेत. 

ती हाती यायच्या आतच 

हवेत विरून गेलीत. 


अचानक वावटळ उठावी 

अन् काही क्षणात विरून जावी 

अगदी तसा.. 

माझा शेतकरी बाप, 

विरून गेला मनामनातून.... 

साऱ्यांच्याच..... 

कायमचा.... 

अगदी मायच्या बी....

 


📚🖋️ राहुल मोरे

९४२१६१२९७९

Evadhich Ichha Kavita

 



            येवढीच इच्छा 


काळया कुट्ट गाभाऱ्यात 

एखादं निस्तेज रोपट डूलाव 

पिवळ्या पानांनी 

तसं हे माणसाचं निस्तेज जीवन...

 

शिवबाच्या या देशात 

माणसानंच माणसाचा 

प्यावा 'खुन '

आणि...

आपणच आपलं अंग 

आपल्याच रक्तान माखलय 

असं घ्यावं सोंग. 

 

भर रस्त्यावर 

बापानं पोरीचा,

अन् पोरानं आईचा,

सौदा करावा

ही लाजिरवाणी गोष्ट.


पोटासाठी 

चौका चौकात 

आयाबाया नटताना दिसतात 

रात्रीच्या 

ह्याला कुठेतरी भेटावा विराम, 

अन् 

थांबावं सार जागच्या जागी 

 

आणि... 

 

उद्याचं नाव सूर्य 

आपल्या नव्या डोळ्यांना 

नवलाईने दिसावा 

एवढीच इच्छा....


 

📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Sunday, October 26, 2025

Manus harvat chalalay

 


  माणूस हरवत चाललाय


सुगीचे दिवस आलेत की माझ्या बापाची 

एकच धांदल असायची

मठ, मुग ज्वारी बाजरी याचे खळे लावायचे. 

बाजरीची सुडी,मठाची गंजी घालून व्यवस्थित 

शेकारायचे,

ह्या आवकळी पावसाच्या धाकाण.


मायचं मात्र मधीच टूमण असायचं 

चार दिवसांवर दिवाळी आली..., 

विना गोड धोडाची दिवाळी 

चटणी भाकरीवर निघायची

आख्खी दिवाळी हंगाम आवरण्यात जायची

पण, 

तरी सुध्दा त्या दिवाळीत मज्जा असायची 

गोड धोड नसलं म्हणून काय झालं

गोड माणसं मात्र सोबत राहायची.

काका काकू आत्या मामा अन् सारी भावंडं 

यांनी घर कसं भरून जायचं 

शरिरान वेगळे तरी मनानं एक रहायचं 


आता मात्र तसं काही उरलं नाही.  

एका घराची दोन दारं झाली

कामा धंद्याच्या निमित्तानं 

माणसं शहराकडे गेली.

आता दिवाळीला एकत्र येत नाही. 

आलेच तर दोन दिवसाच्या वर राहत नाही.

राहिलीच तर एफडी, भिसी, फ्लॅट आणि कार

याचंच तुणतुणं चालतं फार


माया, ममता हरवत होती

आपुलकीनं विचारपूस नव्हती 


अवकाळी पावसाच्या धाकान बाप गंजी, सूडी 

झाकायचा. 


पण, आता काय? 

इथं आपलेपणाचाच दुष्काळ पडत चाललाय. 

माणूस जिता असून हरवत चाललाय

बापाच्या मनातली

ती सुगी, ती गंजी काही केल्या जात नाही.

जीव तीळ तीळ तुटल्या वाचून राहत नाही


पण त्याला कुठ माहीत..

की,

या सिमेंटच्या जंगलात माणसं झालीत परकी 

आता आपल्याजवळ फक्त ती आठवण 

डोळ्यांची खासड झाल्या सारखी.



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...